अपत्यहीन जोडप्याला छळण्याचे मार्ग

"एखाद्या जोडप्याला बाळ होऊ देणं अथवा न देणं हा निर्णय घेण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे",असं जर तुम्हाला वाटत नसेल, तर पुढचा लेख तुमच्यासाठी आहे... "लग्नाला 4, 5, 8, 9 वर्ष झाली तरी घरी अजून पाळणा हलला नाही, असं कसं?"हा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल, तर पुढचा लेख तुमच्यासाठी आहे. "एखादं मूल झाल्याशिवाय स्त्रीचं स्त्रीत्व पूर्ण होत नाही असं जर तुमचं मत असेल", तर हा लेख नक्कीच तुमच्यासाठी आहे. "करिअरमध्ये स्त्री कितीही उच्च असली, भले ती डॉक्टरेट झालेली असली, पण तिला जर मूल नसेल, तर समाजात तिची किंमत कस्पटासमान आहे" असं जर तुमचं मत असेल, तर हा लेख तुमच्यासाठी आहे. तर नमस्कार लोकहो, आज मी घेऊन आलोय. आनंदी विवाहित जोडप्याला किंवा विवाहित आनंदी जोडप्याला सुखानं न जगू देण्याचा क्रॅश कोर्स. ह्यामध्ये समोरच्या जोडप्याला मूल नसणं हेच कसं प्रत्येक समस्येचं मूळ आहे, हे आपल्याला पटवून द्यायचं आहे आणि त्यासाठीच आपण कोणकोणते मुद्दे मांडू शकतो याच्यावर आपण चर्चा करूया. कारण मूल नाही तर काहीच नाही ना? ते समाजात राहूच कसे शकतात? फारच मोठी चूक केलेली आहे त्यांनी. तर सगळ्यात पहिले आपण आधी आडून आडून जाणून कसं घ्यायचं की समोरच्या जोडप्याला मूल आहे की नाही, हे बघूया. कारण डायरेक्ट वार केला तर कदाचित त्यांना राग येऊ शकेल. कारण, मूल होऊ न देणं किंवा मूल हवं तेव्हा, हवं त्या वेळेत होऊ देणं हा त्यांचा पर्सनल निर्णय कसा काय असू शकतो? खरं तर हा विषय किंवा ह्या विषया संदर्भात त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार फक्त त्या मुलाच्या आई-वडिलांना आणि मुलीच्या आई-वडिलांना असला पाहिजे. पण समाज म्हणून आपण हे ॲक्सेप्टच करू शकत नाही. त्यामुळे ह्या क्रॅश कोर्समध्ये आपण हिरिरीने सहभाग घेऊया आणि समोरच्याच्या भावनांचा महाल उध्वस्त करायला शिकूया. नमस्कार मंडळी. समोरच्या जोडप्याला काही अपत्त्य आहेत की नाही याचा आधी अंदाज बांधूया. जर रोजच्या ओळखीतली, रोजच्या पाहण्यातली जोडपी असतील, तर ही पहिली स्टेप करण्याची गरज नाही. तुम्ही थेट त्यांच्यावरती आघात करू शकता, त्यांचा अपमान करू शकता किंवा त्यांना टोचेल असं काहीतरी नक्कीच बोलू शकता. पण खूप दिवसांनी भेटत असाल किंवा तुमचा त्यांच्याशी काहीही संबंध नसेल, पण केवळ तुमच्यातला किडा तुम्हाला स्वस्थ बसू देत नसेल, तुमची सामाजिक जाणीव फारच तीव्र असेल तर अशा वेळेस आपण काय करूया; आधी हे समजून घेऊयात त्यांना मुलं आहेत की नाही. तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करता येईल, की ती जी मुलगी आहे, विवाहित जोडप्यातली, तिला आपण विचारूया की काय मग कसं चाललं आहे आयुष्य? आणि आणखीन काय काय चालू आहे तुझं? तिच्या रुटीन बद्दल जाणून घेण्याची आस्था दाखवत आपण हे मात्र नक्की जाणून घ्यायचं, की ह्या रुटीनमध्ये ती अशा कुठल्या गोष्टीचा उल्लेख करते आहे का, की ज्याचा संबंध बाळाशी आहे. जर तिने नाही केला...तर सापडला गडी! आता मात्र आपल्या स्टेप टू, थ्री, फोर मध्ये जे काही आघात आपल्याला त्या बाईवर करायचे आहेत, ते करायला आपण मोकळे आहोत. हेच जर पुरुषासोबत आपल्याला बोलायचं असेल, तर फार काही नाही, काही मुलं वगैरे आहे का असं तुम्ही सरळ विचारू शकता किंवा घरी कोण कोण असतं हा प्रश्न विचारायचा. आता त्याच्यात सुद्धा एखादा दीडशहाणा निघेलच जो सांगेल मी एकत्र कुटुंब पद्धतीत राहतो. त्यामुळे घरी कोण कोण असतं या प्रश्नाचे उत्तर इतकं लांबेल की त्याच्यात बाळ, मुलं हे शब्द आले का नाही हे आपल्याला कळूच शकणार नाही. मग अशा वेळेस जर हा उल्लेख आला नाही तर मग आपण असं विचारू शकतो की तुम्ही दोघं एकत्र कुटुंब पद्धतीतच राहता का कुठे वेगळा फ्लॅट वगैरे घेतलाय? जर घेतला असेल तर त्या अनुषंगाने आपल्याला पुढे विचारता येईल, मग तिथे कोण कोण असतं बरं? आता इथे सुद्धा जर मूल किंवा बाळ हा उल्लेख आला नाही तर आपण क्रॅश कोर्स मधली पहिली पायरी अतिशय उत्तम रित्या चढलेलो आहे आणि दुसरी पायरी जिथून त्या जोडप्याला गिल्ट देणे, अपमान करणे, त्यांना रडवणे, त्यांच्या पर्सनल स्पेसमध्ये एनक्रोचमेंट करणे म्हणजे अतिक्रमण करणे या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपण सिद्ध झालेलो आहोत. आता एक गोष्ट आपल्यासारख्या समुदायांना ही मान्य केली पाहिजे की आपली सामाजिक जाणीव तीव्र आहे, पण एखाद्या जोडप्याला मूल होत नसेल, तर त्याच्यात पुरुषाचा सहभाग अगदीच नाममात्र असतो. त्यामुळे त्या जोडप्याला मूल का होत नाहीये, याचं दोषारोपण पूर्णतः त्या स्त्रीवर आपल्याला करायचं आहे, एवढं सगळ्यात पहिले आपण घोकून घेऊ. घोकून घोकून पाठ करायला हवं. एकदा का हे पाठ झालं की मग ती जेव्हा केव्हा एकटी सापडेल तेव्हा मग आपल्याला तिला दोन-तीन गोष्टी विचारायच्या आहेत. त्यातली पहिली म्हणजे- १. मग बाळाचा प्लॅन कधी आहे? यावर तिचं उत्तर काहीही जरी असलं, तरी मूल होण्यासाठी स्त्रीलाच कसं आग्रही असावं लागतं, नवऱ्याला भुलवून त्याच्यासमोर शृंगार करून तुलाच कसं मूल पदरात पाडून घेता यायला हवं, हे धडे त्यांना देता येतील. झालंच तर मला कशी दोन मुलं आहेत, त्यातलं पहिलं कसं नैसर्गिक क्रमानं झालं आणि दुसरं मीच कसं मला हवं होतं म्हणून पदरात पाडून घेतलं, याच्या सुरस आणि कल्पना विस्तार केलेल्या कहाण्या त्या व्यक्तीला ऐकवता येतील जेणेकरून तिच्या मनातलं दुःख बाजूला सारून तिला तुम्ही दिलेली गिल्ट नीट स्वीकारता येईल. आता समजा तुम्हाला ती व्यक्ती एकटी सापडतच नाहीये. फारच गृहकर्तव्यदक्ष असल्यामुळे ती वेगवेगळी कामं करते आहे ती मुलगी. तर आता मग तेव्हा तिच्याशी हे विषय कसे काढणार बरं? मग अशा वेळेस आपल्याला काय करता येईल की जेव्हा आपल्या घरी काही कुळाचाराचे कार्यक्रम असतील तर जेव्हा तुम्ही ओटी भरत असाल, तेव्हा आऊट ऑफ नोव्हेअर, काहीही संबंध नसताना पुढच्या वेळेस...... असं म्हणून त्याच्यापुढे तुम्हाला जे जे काही मनातनं मांडायचं आहे, जे काही मनातनं टोचणी त्या मुलीच्या मनाला तुम्हाला लावायची आहे ती लावता येईल. मग एक गोंडस बाळ असू दे, एखादी दोन वेण्या बांधलेली मुलगी असू दे, असं काहीतरी आपल्याला नक्कीच बोलता येईल जेणेकरून सार्वजनिक आयुष्यात सुद्धा ती मुलगी आपल्याला एकटी सापडलेली नसली, तरी सर्वांसमोर आपल्याला तिचा उपमर्द नक्की करता येईल. आता हे सगळं करताना आपल्या घरी परिस्थिती काय आहे? आपल्या सासूबाई कशा चांगल्या किंवा वाईट होत्या? आपल्याच मुलाचे किती घटस्फोट झाले आहेत किंवा एक गंडलेलं प्रेम प्रकरण अस्तित्वात आहे, किंवा आपल्या मुलाला अपत्य झाल्यानंतर ती नवरी मुलगी चुना लावून छानपैकी पळून गेलेली आहे,अशा सर्व गोष्टी तुम्हाला सोईस्कररित्या विसरता यायला हव्यात म्हणजे समोरच्या मुलीला, जी आपल्या समोर छानपैकी निर्मळ मनाने उभी आहे, तिला गिल्ट देण्याचा कार्यक्रम आपल्याला यशस्वी करता येईल. हे करताना त्या मुलीचं मत आपल्याबद्दल वाईट व्हायला नको, एवढी काळजी जर तुम्हाला खरंच असेल तर मात्र हे सगळं बोलताना कंटिन्यूअसली सलगपणे एक वाक्य अगदी सरधोपटपणे वापरता यायला हवं की, बघ बाई, मला काही नाही पण तुझीच काळजी वाटते, तुझं वय निघून चाललं आहे किंवा आजकाल गर्भधारणा होताना खूप त्रास होतात. म्हणून मला तुझी कशी काळजी आहे हे मात्र तुम्हाला सारखं सारखं सारखं सरधोपटपणे बोलता यायला हवं. म्हणजे त्या मुलीला वाईट जरी वाटत असलं तरी ती मनातून हे मानायला बांधील होईल की नाही नाही ही समोरची व्यक्ती खरंच मनापासून बोलते आहे. आता आपण एवढं सगळं करून सुद्धा समोरच्या समोरच्या मुलीच्या डोळ्यातून पाण्याचा एक थेंब सुद्धा येत नसेल, तर मात्र आपला पवित्रा चुकतो आहे याची जाणीव आपल्याला व्हायला हवी. आता तिच्या डोळ्यातून पाणी झिरपावं, तिच्या तिचे डोळे पाण्याने डबडबावेत म्हणून काहीतरी करणं फारच गरजेचं आहे. मग अशा वेळेस तिनं करियरमध्ये कितीही उंची गाठली तरी माझ्या मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये मी तुझ्याबद्दल काही बोलताना तुला मूल नाही हाच विषय कसा वारंवार येईल आणि तुझ्यामुळे आम्हा सर्वांची सामाजिक पत थोडीफार का होईना कमी होत आहे, याची जाणीव तुम्हाला त्या मुलीला करून देता यायला हवी. आता मात्र तिच्या डोळ्याच्या कडा पाणावलेल्या असतील आणि आपण नक्कीच दुसऱ्या पायरीवरती आलेलो असू. आपला या क्रॅश कोर्स मधला सर्वात महत्त्वाचा भाग आत्तापर्यंत शिकून झालेला आहे. आता पुढच्या काही ॲडव्हान्स टिप्स आहेत, त्या आपण तिसऱ्या किंवा झालंच तर चौथ्या पायरीवरती बघूया. तिसऱ्या पायरीवर आल्यानंतर कदाचित असं होऊ शकेल की ती मुलगी चांगुलपणानं तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करील की कसे आम्ही अजूनही बाळ होण्यासाठी प्रयत्न करतो आहोत, पण होत नाहीये. मग अशा वेळेस तुम्ही फारच उदारता दाखवत किंवा उदारमतवादी दृष्टिकोन घेऊन असं म्हणू शकाल की, "नवऱ्यामध्ये तुझ्या काही कमतरता आहे का? त्याला कुठल्या प्रकारची मदत हवी आहे का? माझ्याकडे काही पुस्तकं आहेत. माझ्या अनुभवानुसार मी त्याला काही माहितीपर सत्र देऊ शकतो. त्याच्यासमोरील समस्यांचं दुरीकरण किंवा निराकरण करू शकतो. तुला जर वाटत असेल, तर मी नक्की त्या तुझ्या नवऱ्याशी बोलेन" किंवा आपल्या खिशात दीड दमडी जरी नसली तरी मी तुझ्यासाठी कशी पैशांची तरतूद करू शकते किंवा शकतो याची जाणीव त्या मुलीला करून द्या. म्हणजे तुमच्या उपकारांच्या ओझ्याखाली आणि स्वतःच्या मूल जन्माला न घालण्याच्या किंवा न घालू शकण्याच्या परिस्थितीत परिस्थितीला कंटाळून तिच्या रागाचा, तिच्या भावनांचा उद्रेक होईल आणि पुन्हा एकदा तिच्या डोळ्यांच्या कडा नुसत्या पाणावणार नाहीत तर तिचे पाण्याने डबडबून वाहायला लागतील आणि आपण तिसरी पायरी ओलांडून चौथ्या पायरीवरती पोहोचलेलो असू. आता ही चौथी पायरी कोणासाठी आहे सांगतो. समजा तुम्ही त्या समोरच्या जोडप्याच्याच वयाचे असाल आणि इतके वर्ष प्रयत्न करून तुम्हाला मात्र आता एखादं मूल झालेलं आहे आणि त्या समोरच्या जोडप्याला नाही झालेलं, तर या कोर्सच्या अतिशय आदर्श टप्प्यावर तुम्ही आहात. आता जगातलं सगळं तुम्हालाच कळतं, अपत्य जन्माला घालणं हे किती सोपं काम आहे, याच्याबद्दल तुम्ही सतत त्या मुलीला लेक्चर देत राहायला हवं. अगदीच वेळ पडली तर तुझा नवरा जर मूल जन्माला घालू शकत नसेल तर तूच त्याच्या अंगावर उताणी पडून कसं मूल जन्माला घालता येऊ शकतं, ही माहिती तिला अगदी सविस्तर द्यावी. ती मुलगी जेव्हा तुम्हाला चार-सहा महिन्यांनी भेटत असेल, अतिशय उत्साहाने तुम्हाला ती भेटायला आली की सगळ्यात पहिले माझ्या मुलानं काल शाळेमध्ये काय गंमत केली, काल तो कसा नटला होता, त्याला मी कोणते कपडे घातले होते ह्याबद्दल अगदी हिरीरीने सांगावं. असे चान्स आपण सोडले नाहीत म्हणजे नक्कीच त्या मुलीला प्रचंड गिल्ट आणि डिप्रेशन येईल. एवढं जमलं की आपण या क्रॅश कोर्सच्या शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचलेलो असतो. खरं तर हा क्रॅश कोर्स इथेच संपलेला आहे, टप्पे वाढले तर ऍडव्हान्स कोर्सची शाळा मला घ्यावी लागेल. ती कदाचित मी नंतर कधीतरी घेईन. हा लेख जर इथपर्यंत तुम्ही वाचला असेल, तर माझं तुम्हा सर्वांना एकच सांगणं आहे, की या लेखातील उपरोध समजून घेण्यात यावा आणि ही गोष्ट किंवा या गोष्टीची खूणगाठ आपण मनाशी बांधायला हवी, की मूल जन्माला घालणं अथवा न घालणं हा त्या जोडप्याचा अत्यंत पर्सनल विषय आहे. त्या जोडप्याचे डोळे उघडणं, त्यात अंजन घालणं याचे मक्तेदार आणि ठेकेदार आपण कुणीही नाही किंवा असू शकत नाही. त्या मुलांना योग्य मार्गदर्शन करण्याचं काम त्या दोघांचे रिस्पेक्टिव्ह आई-वडील अवश्य करतील किंवा करतच असतात. आपण ही सामाजिक जबाबदारी स्वतःहून स्वीकारण्याची काही एक गरज नाही. आपण जेव्हा त्या जोडप्याला, वर चार-पाच पायऱ्या ज्या काही मी सांगितल्या त्यानुसार वारंवार खोदून खोदून किंवा आडून आडून विचारतो त्यांच्या अपत्यप्राप्तीबद्दल, तेव्हा त्यांना होणारं दुःख, त्यांना येणारी गिल्ट ही नक्कीच वाढत असते आणि या सगळ्या आपल्याला मात्र एक गोष्ट बिलकुल माहीत नसते, की ते जोडपं किती वर्ष अपत्यप्राप्तीसाठी प्रयत्न करत आहे? ती मुलगी कोणकोणते उपचार स्वतःवर करून घेत आहे? किती सोनोग्राफ्या तिनं मनाच्या विरुद्ध जाऊन केल्या, किती हॉर्मोनची इंजेक्शने घेतली. आयुर्वेद, होमिओपॅथी, नॅचरोपॅथी, फ्लॉवर रेमेडी किंवा अशा असंख्य प्रकारच्या उपचार पद्धती कुणी ना कुणी सांगितल्यामुळे कोणाच्या ना कोणावरती असलेल्या विश्वासामुळे त्या जोडप्यानं स्वतःवरती त्यांचे उपचार घेतलेले असतील, हे आपल्याला ठाऊक नसतं. त्यानंतर दर महिन्याला जेव्हा त्या स्त्रीला पाळी येते, तेव्हा आपले अनेक कष्ट पुन्हा एकदा वाया गेल्याचं किंवा फलद्रूप न झाल्याचं दुःख त्या जोडप्याला वारंवार होत असतं. सेक्स ह्या प्रकारातील आनंद कधीच संपलेला असतो, कारण तो आता रिझल्ट ओरिएंटेड झालेला असतो. ते दर महिन्याला एका विचित्र मानसिक अवस्थेतून जात असतात. पुन्हा एकदा उभारी घेऊन नव्याने प्रयत्न करीत असतात अपत्यप्राप्तीसाठी. दर थोड्या दिवसांनी युरिन प्रेग्नन्सी टेस्ट जेव्हा निगेटिव्ह येते तेव्हा मनाची घातलेली समजूत, पाळी येते की नाही ते बघू मग ठरवू असं मानून कमी केलेलं दुःख सांगायला ते आपल्यापर्यंत येत नसतात. या सगळ्यामध्ये समाज म्हणून आपण काही गोष्टी केल्या पाहिजेत असं मला वाटतं, ज्या आजचा मॅच्युअर समाज, आजचा सुशिक्षित समाज अजिबात करत नाही, असं माझं ऑब्झर्वेशन आणि मत आहे. तर वारंवार हे दुःख आणि गिल्ट त्या दोघांना न देता त्या जोडप्याचं आयुष्य सुकर करायचं असेल आपल्याला, तर आपण वर सांगितलेल्या चारही पायऱ्या नाही चढलो तरीसुद्धा त्या दोघांचं आयुष्य खूप सोपं होईल आणि समाजाशी किमान झगडण्यात त्यांचे जे कष्ट आणि मानसिक शक्ती खर्च होते, तिला आळा घालता येईल. प्रसंगी मूल होत नसल्याची एंग्झायटी जी त्यांच्या परफॉर्मन्स वरती, सेक्शुअल परफॉर्मन्स वरती प्रभाव टाकत असेल, तर किमान ती कमी होईल आणि त्या जोडप्याला अपत्त्यप्राप्ती होण्याची शक्यता वाढीस लागेल. याशिवाय मूल जन्माला घालण्यात पुरुषाचाही खूप वाटा असतो. त्यामुळे वरीलपैकी कुठलीतरी पायरी चढण्याची जर तुम्हाला इच्छा झाली, तर किमान त्या पुरुषाच्या परफॉर्मन्सला, त्याच्या सिमेन मधल्या स्पर्म काउंटला सुद्धा महत्त्व द्या आणि त्या जोडप्याशी अतिशय वाईट पद्धतीने बोलून जेव्हा तुम्ही त्यांना दुःख देत असाल, तेव्हा त्या मुलाला सुद्धा काहीतरी त्रास असू शकतो. एवढं मात्र नक्की कन्सिडर करा, कारण मूल जन्माला घालण्याची जबाबदारी फक्त स्त्रीची नाही किंवा त्या दोघांची मूल जन्माला घालणं ही जबाबदारीच नाही, तर तो त्या दोघांचा पूर्णतः ऐच्छिक विषय आहे. त्यामुळे असं एखादं जोडपं जर तुमच्या आजूबाजूला असेल आणि तुमच्या तावडीत सापडलं, तर कुठल्या दिशेनं आपलं संभाषण न्यायचं याची जाणीव तुम्हाला झाली असेल असं मी गृहीत धरतो आणि थांबतो. -केदार पाध्ये

Public Last updated: 2026-05-01 05:45:17 PM